जाती-व्यवस्था याबद्दल तुझ मत सांग असा आग्रह माझ्या एका मित्राने धरला. आता काय बोलायचं ह्याला. मी कोण लागून गेले मोठी या बाबत मत वगैरे सांगायला? पण डोक्यात विचार चक्र सुरु झालं. खरं तरं हा माझा सगळ्यात नावडीचा विषय. आणि त्यात माझं मत विचारणं म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास म्हणतात नं तस.
एखाद्या नव्या भेटलेल्या मित्राला अथवा मैत्रिणीला आपण नाव विचरतो. तो अथवा ती सांगते काय ते अमुक अमुक. पण कुठेतरी पुढच्या काही क्षणांमध्ये आपल्या मनाने एका कोपऱ्यात त्याला किंवा तिला नेऊन बसवलेलं असतं. अगदी नकळत. भले आपली इच्छा असो व नसो. बऱ्याच वेळा माझं डोक माझं न ऐकता स्वतःच काय ते ठरवून टाकतं. त्यापैकीच ही एक वेळ. स्वतःवरच होणारी चिडचिड, आरडाओरडा हे सगळं नंतर हो. त्या क्षणाला मात्र त्याच्या किंवा तिच्या पूर्ण नावावरून मला काय तो सोक्ष-मोक्ष लागलेला असतो, माझी इच्छा नसताना पण.
शाळेत असताना मधल्या सुट्टीत शिपाई काकांनी येउन अमुक एका मैत्रिणीच नाव घेतलं, ती एकदम पळत पळत वर्गाबाहेर गेली, तितक्याच पट्कन पळत परत आली आणि एक एन्वलप दप्तरात ठेवलं. त्या नंतर बाकी सगळ्या जणी पटकन तिच्या जवळ जाऊन किती मिळाले अस विचारायच्या. तिने उत्तर दिल्यावर नाक मुरडायच्या, आम्हाला बुवा काही मिळतच नाही. अस बोलायच्या. विषय इकडे सुरु व्हायचा. कारण पुढच्या मधल्या सुट्टीत शाळेच्या गेटमधून गुपचूप बोरं आणताना तिला विचारलं जायचं, इतकंच नाही तर तिला दोन रुपये जास्तचं मागितले जायचे. ती कधी कधी द्यायची तर कधी कधी नाही म्हणायची. नाही म्हटली तर चर्चेला उधाण यायचं, आत्ताच तर मिळाले तरी नाही म्हणते बघ.
माझा मुद्दा खूप सोप्पा आहे. आमच्या वर्गाचा पट ६०. एकदा तरी एखाद्याच्या घरी हा प्रसंग नक्कीच बोलला गेला असेल. तेंव्हा त्याला किंवा तिला काय बरं उत्तर मिळाल असेल घरून? घरातून किंवा नकळत समाजातून या प्रश्नाला एक वेगळंच वळण लागलं असणार. अस म्हणतात, लहान मुले पटकन शिकतात. कदाचित खरच पटकन लक्षात येत असेल त्यांच्या. पण मला खात्री आहे की, प्रत्येक लहान मुलाला एकदा तरी 'अस का बरं?' असं नक्कीच वाटत असणार.
अकरावीत असताना आमच्या केमिस्ट्रीच्या एका अध्यापिकीने काही फ़ोर्मुले चुकीचे शिकवले. ते निदर्शनास आल्यानंतर आम्हाला पाटी कोरी करायला सांगून सगळा काही पुन्हा नव्याने शिकवलं. तरी परीक्षेत थोडासा गोंधळ काय तो उडालाच. असंच झालय का आत्तापण? नकळत पणे चुकीची लिहिली गेलेली सूत्रे आता एक बोळा फिरवून पुन्हा शिकवता आणि लिहिता येतील? आणि सुदैवाने असे झालेच तरी आयुष्याच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ उडणार नाही ह्याची खात्री कुठे आहे? कारण एकच साधी गोष्ट आम्हाला एकदा खूप चुकीची शिकवली आहे आणि आता तिची खरी संकल्पना समजावून घेण्याच्या मनस्थितीत आहोत का आम्ही?
No comments:
Post a Comment