Thursday, 16 October 2014

माझी आई

               स्वतःपुढे मला काहीच दिसत नाही. मी  सकाळी घरातून निघते.जरा पाय आपटत. "आई , नेहमी प्रमाणे बस नाही मिळणार गं वेळेवर.. त्यात तू डब्याला उशीर केलास .. जाऊ दे .. बघते माझं मी " असं म्हणत वड्याचं  तेल वांग्यावर काढत घराबाहेर पाऊल टाकते. मला मनात पक्क माहित असतं, उशीर होण्याच कारण माझ्या वस्तू शोधण्यात घालवलेला वेळ. पण मान्य करायच नसतं.
               पुढे बससुद्धा वेळेत मिळते. आणि शिवाय कानात गाणीपण लगेच  सुरु झाली पाहिजेत. जाणीव वगैरे सगळ होतं हो, पण ते फक्त कोणीतरी जाणीव करून दिल्यानंतर. जेव्हा स्वतःच टेम्पर गेलेल असत, तेंव्हा अस काही सुचत नाही. पुढे सिग्नलला बस थांबल्यावर आपोआपच हात मोबाइलकड़े जातो. "आई ??" "बोल बाळा, बस मिळाली नं? आणि डब्बा खा ग बाई वेळेवर." मला मेल्याहून मेल्यासारख वाटतं. "आई सॉरी ". "गप गं वेडे, ये लवकर घरी." "हो, ठेवते."
                कानात चालू असलेली गाणी आपोआप बंद होतात. आणि डोक्यात विचार सुरु होतात. माझा सगळ्यात जास्त जीव आईवर. पण स्वतःचा तोल काही सांभाळता येत नाही. स्वतःच्या वस्तू मी जागेवर ठेवत नाही, त्या शोधण्यात वेळ घालवते, आणि मग आईवर चिड़ते. ती शांतपणे सहन करते. हा कुठला न्याय? लहानपणापासून मला पाठीशी तीच घालते. पण मी तिला दुखवते. पेपरमध्ये एका नाटकाची जाहिरात वाचलेली. तेंव्हा एकदम चरर्र झालं. नाटकाचं नाव 'आई रिटायर होतेय.'  कल्पनापण करवत नाही. नकोसं झालं एकदम.
                चूका सगळ्या माझ्या, चिड़चिड़ माझी, पण सावरून तिने घ्यायचं. "आई दोन्हींपैकी कोणता टॉप घेऊ?" असा प्रश्न विचारल्यावर ती दुकानदाराला सांगते "दोन्ही पैक करा." सकाळी अभ्यासाला उठल्यावर मला झोप येऊ नये म्हणऊन ती माझ्याबरोबर ५ वाजता उठून बसते. मला ताप आला की तीच दवाखाण्यापासून देवापर्यंत सगळ काही करुन झालेल असतं. ती माझी आई. माझं जगणं पूर्ण करते. माझ्या आयुष्यात ती नाही तर काहीच नाही. अगदी काहीच नाही.

No comments:

Post a Comment