Tuesday 22 September 2015

शिवरायांचा आठवावा प्रताप १/५

शिवरायांचा आठवावा प्रताप १/५

पुरंदरे लिखित- राजा शिवछत्रपती…!
वाचनाचा दिव्य अनुभव…! हाच ग्रंथ माझ्या शब्दात मांडायचा पहिला प्रयत्न.
शिवरायांच्या जन्मापर्यंतची कथा…अगदी थोडक्यात… काव्य पंक्तींमध्ये… !

अंधारलेली झाडी सारी, दंडकारण्याच्या द्वारी ।
उजाडली हो, स्वारी रामाची होता ।।
गोदावरी राणी, काळवंडलेलं पाणी।
उतरली करणी आता, राम स्पर्शाने ।।
कोणास कसले मोल, विचार जरी खोल।
प्रभावी बोल संतांचे बघा।।
तरी अंधारली वाट काळोखसा दाट ।
प्रलयाची लाट स्वराज्यावर ।।
कोण यांस पूज्य? वर्तन सायुज्य?
यादवांचे राज्य मातीमोल केले।।
काळवंडले दर्पण, ' मी काळ कर्दन,
रामरायाची गर्दन आणीन' म्हणे निजाम।।
पराजय ल्याली ती मान खाली।
मंदिर वैभवशाली घृष्णेश्वराचे।।
जिजाऊने सारे, रक्तमांसाचे वारे ।
अंगावर शहारे घेत बोली।।
'गेले हो दत्ताजी आणि मंडळी संभाजी।
गंगा यमुना माझी, कोणासाठी काढू?'।।
करेल राज्य मनावर, मुघलांच्या छाताडावर।
असा सुवर्ण वर, दे ग आई।।
अन बघता बघता तो क्षण जवळ येउन ठेपला।
म्हणे सूर्य दिपला, शिवबाच्या दर्शनाने।।

Thursday 11 June 2015

भयाण..?

             

                  भयाण वास्तवाचं
                  झणझणतं काजळ
              जे रोज नव-नव्या नजरा
                 अंगावर घेते
            आणि बंधनात अडकवणारे घुंगरू
               जिथे भीती
                लाज आडवी येते    
               


           प्रत्येक शहराच्या एका कोपऱ्यात अशी एक अंधारात रमणारी, आणि दुसऱ्यांच्या वासना पुरवून त्यांचं क्षणिक जग उजळवणारी वसाहत असतेच. सततची गर्दी, अंधाराची सवय झालेले आणि त्याच अंधाराची वाट बघणारे डोळे, संवेदना हरवलेल्या नजरा, शृंगाराला सततची गरज समजणारी मनंकुठून सुरुवात होते? आणि कुठे संपत हे सगळ? आणि खरच संपतबऱ्याच वेळा काही वृत्तपत्रांमधून आणि वाहिन्यांवरून अस समजत की, अनेक महिला आणि मुलींना या आगीत बळचं ढकललं जात. पण वास्तविक पाहता, स्वतःहून वेश्याव्यवसायात जाणाऱ्या स्त्रियांची संख्या खूप आहे. कोणत्या समाजामध्ये, संस्कृतीमध्ये अस नव्हतं? इतिहासामध्ये  अपवादासाठीसुद्धा अस उदाहरण सापडणार नाही.
      स्त्रियांच्या सौंदर्यात भर टाकणारे पैंजणचिमुकलीच्या पायात छुम छुम वाजणारे पैंजण सगळं आंगण दुमदुमून टाकतात. पण मग  पैंजण घुंगरू होतात तेव्हा? भारतीय शास्त्रीय नृत्यात घुंगराना अनन्यसाधारण महत्व आहे. ते निर्विवाद आहे. पण, त्या नृत्यामधल्या घुंगराना  बदनामीची, वासनेची झालर मुळीच नसते. ती एक कला आहे. मान-मरतब वाढवणारी आणि दाद मिळवणारी. पण इकडे ते घुंगरू ओळख हरवतात का? जिथे संवेदनाच हरवते आणि स्वतःसाठी वाटणारी सहानुभूती पण मेलेली असते, तिथे घुंगरांच्या महत्वाच काय घेऊन बसता. या सगळ्या मागची मानसिकता आणि भूमिका समजून घेण म्हणजे शून्यात नजर लाऊन बसण्यासारख आहे. ज्याचं उत्तर कोणाकडेच नाही, पण म्हणून प्रश्नच विचारण सोडून द्यायचं का? या भीषण वास्तवाकडे किती काळ आपला सुद्न्य समाज पाठ फिरवणार?
      मुळात हा गडद रंगाचा समाज तुमच्या-आमच्या सारख्या पांढऱ्या, आणि उगाचच स्वछ म्हणवणाऱ्या समाजानेच बनवलाहातात घेतलेल्या नव्या कोऱ्या पांढऱ्या रंगाच्या रुमालाला डाग पडून तो लगेच खराब होऊ नये, म्हणून रुमालाच्या एकाच कोपऱ्याला हात पुसतो आपण? अगदी तसच. तसच केल आपण, अजूनही  करत आहोत. पूर्वी राजे, धनिक समाज या वाटेकडे वळायचे. म्हणतात , पोटासारखी वाईट गोष्ट नाही. त्यामुळे  वेळोवेळी या  वाटेला पैसा कमवण्याचा एक मार्ग म्हणूनच पाहिलं गेल. आणि तसं पण, पैसा हे  एकच कारण आहे. पण त्या नंतर काय? महिलांचे  स्वास्थ्य, बदलत जाणारी मानसिकता, वाढत जाणारे वय आणि निर्माण होणारे शारीरिक, मानसिक, व्यावहारिक प्रश्न, जन्माला येणारी अर्भक, ठराविक वयानंतर व्यवसाय बंद झाला की त्या नंतर गरजेच असणार पुनर्वसन या आणि अशा अनेक प्रश्नाचं काय? सगळ्यात जास्त संवेदनशील असणाऱ्या या विषयाकडे इतक रुक्ष पणे पाहणाऱ्या आपल्या डोळ्यांना ही अशी सवय लागली आहे की, विसर पडला आहे? साक्षात स्वामी विवेकानंद भारतात आल्यानंतर सोनागाचीला जाऊन ढसाढसा रडले होते, त्यांच्या एक दशांश संवेदना जरी आपल्याला आपल्या छोट्याश्या कामातून, विचारांमधून जागवता आली, तरी लवकरच दृष्टीकोन आणि 'ती' नजर बदलायला सुरुवात होईल.

Monday 25 May 2015

पौरोहित्य

   शाळा संपली आणि दहावीच्या सुट्टीमध्ये शाळेमध्येच पौरोहित्य वर्गाला जाऊन पौरोहित्य शिकले. अतिशय वेगळा आणि सात्विक अनुभव होता. शाळा ज्ञान प्रबोधिनी, त्यामुळे सगळ्या कृती, श्लोक, त्यांचे अर्थ, त्यांच्या चाली, लागणारी सामुग्री यथावकाश पण नीट, अर्थ समजून उमजून शिकवलं गेल. त्यानंतर घरामध्ये गणेश चतुर्थीला मी सांगणार आणि बाबा कार्य सिद्धीस नेणार हा नेम. मग काही दिवसांनी आवडीने सत्यनारायाणापासून  अगदी श्राद्ध विधींपर्यंत सारं काही शिकून घेतल.
     आज सकाळी एका मैत्रिणीचा फोन आला त्यानिम्मिताने सगळं आठवल. ''ते पूजा वगैरे जमेल न सांगायला? सत्यनारायण… मोजून १५-२० मिनिटांच काम आहे. अगं, गडबड आहे ग फार, आणि बाकी पुजारी वगैरे फारच वेळ लावतात, बघ जमतय का…'' इति. मी माझ्यापरीने समजवायचा प्रयत्न केला. मुळात पौरोहित्य हे काही माझं काम (म्हणजे व्यवसाय बर का) नाही, कारण मी ते काम मानत नाही. माझ्या मनाला एक प्रकारची विलक्षण शांतता देणारी कृती आहे ती. आणि आग्रहाच्या अश्या निमंत्रणापेक्षा मी ज्यांच्याकडे भरपूर वेळ आणि आवड आहे अशा निमंत्रणांना स्विकारेल.
    पौरोहित्य म्हणजे नेमक काय? हा अगदी चर्चेचा विषय  होऊ शकतो. निवडक श्लोकांचे उच्चारण, चित्रपटातल्या गाण्यांसारखा वेग हे अस काही अजिबातच नाही. प्रत्येक मंत्र कसा म्हणायचा? आहे तसा? की संधी विग्रह करून? आणि संधी विग्रह केला  तर बऱ्याच वेळा अर्थ बदलू शकतो त्याचं काय? आचमन करायला लावण्यामागच प्रयोजन काय? एखादी अशी गोष्ट/ कृती घडली की ज्या मुळे लक्ष विचलीत होऊ शकत उदा. शिंका जांभई तर आचमन करणे अगदी योग्य. अतिशय पवित्र, सात्विक असे हे पौरोहित्य काही जणांचा व्यवसाय असू शकतो, आहेच. पण म्हणून हा एकच दृष्टीकोन उरला आहे का पौरोहित्याकडे बघायचा?

Sunday 3 May 2015

पुरुष नावाची जात…

पुरुष नावाची जात…
            आज आयुष्यात पहिल्यांदाच एक नवा अनुभव आला. म्हटलं सगळ्यांबरोबर शेअर करुयात. ऐन दुपारी, १२ च्या चांदण्यात गाडीने प्रताप दाखवला आणि रस्त्याच्या मधोमध पंक्चर झाली. करणार काय? नशीबाने अगदी ५ मिनिटांच्या अंतरावर पंक्चर काढायच दुकान सापडलं. दुकानात ३-४ माणसं होती. निसर्गाने मुलींना एक जास्तीचा सेन्स दिलेला असतो. एरवी पटकन गडबडून जाणाऱ्या, छोट्या छोट्या गोष्टींवर घाबरणाऱ्या मुलीसुद्धा पुरुष नावाच्या जातीची प्रत्येक नजर पक्की ओळखतात.
    तस मला त्या दुकानातील मुलांबद्द्ल विशेष अशी काहीही तक्रार नाही. कारण मुलींकडे विचित्र कटाक्ष टाकणारी नजर जरी त्या मुलांची असली तरी त्या मागची दृष्टी मात्र नकळतपणे बनते. उन्हाचा पारा चढतचं होता. आणि नाही म्हटलं तरी 'त्या' नजरांमुळे आणि मानसिकतेमुळे माझापण पारा चढायला लागला होता.  'कुठून आला आहात?', 'घरी कोण कोण असत?', इकडे कोणत्या कॉलेजला आहात?', 'आता वेळ लागणार आहे, हव तर चहा पाणी घेऊन या'… या आणि अश्या अनेक फुकटच्या बाता.
    आईच्या सल्ल्यानुसार एका मित्राला बोलवल. तो आला तसं मात्र 'त्यां'च वागण बदलूनच गेल की. एकदम decent न राव. पुरुष नावाच्या जातीबद्द्ल बोलायला मी काय कोणी फार मोठी नाही लागून गेले. आणि मुळात माझ्या मनात पुरुषांबद्द्ल म्हणा किंवा माणसांबद्द्ल म्हणा, अगदी यथोचित आदर आहे आणि देवाकृपेने मला तितकेच भन्नाट मित्र, भाऊ, मार्गदर्शक, गुरु, वडील-माणसं लाभली आहेत, हे माझ भाग्यच. पण त्यावेळी आपण किती क्षणिक विचार करू शकतो, याचे भान आले. या प्रसंगी कोणत्याही मुलीची चिड़चिड़ होणे अगदी स्वभाविक, माझी देखील झालीच न. पण एक प्रश्न पड़ला. कोणाची ओळख  स्वतःला करून द्यायची? मला इतके असुरक्षित असल्याचे भासवून देणाऱ्या 'त्या' पुरुषांची की उन्हात जेवण वगरे सोडून मदतीला येणाऱ्या एका मित्राची? एका दोघा पुरुषांनी त्यांच्या नजरेतून वासनेच दर्शन घडवलं म्हणून सगळ्यांनाच आपण त्या नजरेतून पाहायच का? नकळतपणे 'पुरुष' नावाच्या या जातीचे खरे रूप, खरी  ओळख तर आपण विसरलो नाहीत न? एक मित्र, भाऊ, मार्गदर्शक, गुरु, वडील म्हणून मला कायमच भरभरुन दिलेल्या या जातीकडे डोळसपणे पहायला ह्वे. असे करत राहिल्यास एक दिवस 'त्यां'ची नजर देखील नक्कीच बदलेल, आपण बदलू.

''कृपया येथे 'जात' या शब्दाचा तुम्ही सगळ्यांनी योग्यच अर्थ घ्यावा ही अपेक्षा''

Thursday 16 April 2015

German and Sanskrit

            I am teaching and thus learning German language since last two and half years. I was and I am in love with all the languages and this affair has been started seven eight years ago, when I was in school. I studied Sanskrit for the first time and immediately fell in love with her. It was scoring. I still remembered, that my Sanskrit teacher refused to distribute the answer-papers in class because I was absent and had scored out of marks. This made me feel so special and thus decided to start with further Sanskrit preparations.
            German was never on my mind. It was all of sudden. I studied German but was not so sure about this profession. And then came the time, when I actually tried to link up these two languages. Sanskrit is said to be the mother of all the European languages. But there are critics for such a judgement. Anyway, Sanskrit seems to be at least a data provider to German, if not mother. Here I have short listed some similarities and traces of both the languages.
           Many words of German language are similar to Sanskrit. Then comes the grammar part. I have always realised, that no one can teach or learn German on the basis of English language. Even though, many words of English and German language are similar, grammar part needs help of respective Native language. The verb acts so differently in German language, that English seems to be so easy. We make changes in verbs in both German as well as Sanskrit language as per the person.
Ich gehe  अहं गच्छामि।
Er geht स गच्छति। 
                     The most crucial part of both languages is 'adjective endings'. Its impossible to explain in English, because English has no such rules. German and Sanskrit adjectives are declined based on gender, number and cases. One should have lots of passions and courage to get this adjective endings. I am studying both the languages simultaneously and thus preparing myself to trace their similarities with my studies. This blog is just an example of that. All suggestions are welcome so that I can put my studies in these manner further.

Monday 23 February 2015

baba

         लहानपणी हातात हात धरून किंवा खांद्यावर बसवून बाबा फिरायला न्यायचे. जग किती साध, सरळ, सोप्प आणि मस्त वाटायचं. मला अजून आठवत. दर शनिवारी मी सकाळी लवकर उठून आवरून बसायचे. त्यावेळी आम्ही नगरला राहायला होतो. सकाळी उठायचं, आवरायचं आणि गाड़ी जवळ जाऊन उभ राहायचं. मी एकदम बाबांसारख तयार व्हायचे. बाबा गाडीची चावी खिशात टाकायचे आणि टी-शर्टच्या खिश्यात कायम दोन पेन, एक टेस्टर (इंजीनियर होते न) ठेवायचे. बास, मी पण तसच तयार व्हायचे आणि मग आमची स्वारी निघायची.
         आधी हनुमानाच मंदीर आणि मग अगदी त्या समोरची एक बेकरी. मला हवं ते मी मागायचे आणि बाबांनी कधी नाही म्हटलेलं मला आठवत नाही. प्रत्येक वेळी ताई शाळेत असायची म्हणून आम्ही घरी जाताना तिला खाऊ घेऊन जायचो पण तो मात्र माझ्याच पसंतीचा. बाबांचा कायमच माझ्यावर खूप विश्वास होता. स्कॉलरशीपचा अभ्यास बाबांनी स्वतः घेतलेला आणि मला स्पष्ट संगीतलेल की बाकी काही कर पण गणितात पैकीच्या पैकी हवेत आणि पेपर देऊन बाहेर आल्यावर मी ओरडत सुटलेले की बाबा फ़क्त एक गणित चुकलं. निकाल आला ९८/१००. 
          माझ्या प्रत्येक निकाला आधी मला काहीतरी बक्षिस देणारे माझे बाबा. मुली म्हणून कधी राग राग तर सोडा पण साध रागवलेल पण मला आठवत नाही. माझ्या जन्माच्या आधी मुलगी होणार माहीत होत. उलट घरात तर सगळे खुश होते. बाबा तर म्हणायचे की आमच्याकडे पाचव्या पिढीला मुली झाल्या आहेत. गणित आणि इंग्रजी त्यांचे आवडते विषय. त्यांनीच हट्टाने मला शिकवले. माझ्या मागच्या वाढदिवशी आई आणि बाबांनी मिळून २१ वर्ष पूर्ण झाली म्हणून छोटे छोटे २१ गिफ्ट्स आणले. लाड हा खूपच साधा शब्द वाटतो मला. 
         आज बाबा नाहीत. त्यांना जाऊन ४ महीने होतील. कमी जाणवते. पण मला या परिस्थितीवर उत्तर काही सापडत नाही. ते शोधाव अस वाटत पण नाही. पण एक नक्की, I miss you… ते म्हणतात न, जगाच्या पाठीवर सगळ मिळेल पण आई बाबा काही मिळत नाहीत. 

Thursday 22 January 2015

Pati kori kashi karnar?

          जाती-व्यवस्था याबद्दल तुझ मत सांग असा आग्रह माझ्या एका मित्राने धरला. आता काय बोलायचं ह्याला. मी कोण लागून गेले मोठी या बाबत मत वगैरे सांगायला? पण डोक्यात विचार चक्र सुरु झालं. खरं तरं हा माझा सगळ्यात नावडीचा विषय. आणि त्यात माझं मत विचारणं म्हणजे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास म्हणतात नं तस. 
          एखाद्या नव्या भेटलेल्या मित्राला अथवा मैत्रिणीला आपण नाव विचरतो. तो अथवा ती सांगते काय ते अमुक अमुक. पण कुठेतरी पुढच्या काही क्षणांमध्ये आपल्या मनाने एका कोपऱ्यात त्याला किंवा तिला नेऊन बसवलेलं असतं. अगदी नकळत. भले आपली इच्छा असो व नसो. बऱ्याच वेळा माझं डोक माझं न ऐकता स्वतःच काय ते ठरवून टाकतं. त्यापैकीच ही एक वेळ. स्वतःवरच होणारी चिडचिड, आरडाओरडा हे सगळं नंतर हो. त्या क्षणाला मात्र त्याच्या किंवा तिच्या पूर्ण नावावरून मला काय तो सोक्ष-मोक्ष लागलेला असतो, माझी इच्छा नसताना पण. 
       शाळेत असताना मधल्या सुट्टीत शिपाई काकांनी येउन अमुक एका मैत्रिणीच नाव घेतलं, ती एकदम पळत पळत वर्गाबाहेर गेली, तितक्याच पट्कन पळत परत आली आणि एक एन्वलप दप्तरात ठेवलं. त्या नंतर बाकी सगळ्या जणी पटकन तिच्या जवळ जाऊन किती मिळाले अस विचारायच्या. तिने उत्तर दिल्यावर नाक मुरडायच्या, आम्हाला बुवा काही मिळतच नाही. अस बोलायच्या. विषय इकडे सुरु व्हायचा. कारण पुढच्या मधल्या सुट्टीत शाळेच्या गेटमधून गुपचूप बोरं आणताना तिला विचारलं जायचं, इतकंच नाही तर तिला दोन रुपये जास्तचं मागितले जायचे. ती कधी कधी द्यायची तर कधी कधी नाही म्हणायची. नाही म्हटली तर चर्चेला उधाण यायचं, आत्ताच तर मिळाले तरी नाही म्हणते बघ. 
        माझा मुद्दा खूप सोप्पा आहे. आमच्या वर्गाचा पट ६०. एकदा तरी एखाद्याच्या घरी  हा प्रसंग नक्कीच बोलला गेला असेल. तेंव्हा त्याला किंवा तिला काय बरं उत्तर मिळाल असेल घरून? घरातून किंवा नकळत समाजातून या प्रश्नाला एक वेगळंच वळण लागलं असणार. अस म्हणतात, लहान मुले पटकन शिकतात. कदाचित खरच पटकन लक्षात येत असेल त्यांच्या. पण मला खात्री आहे की, प्रत्येक लहान मुलाला एकदा तरी 'अस का बरं?' असं नक्कीच वाटत असणार. 
   अकरावीत असताना आमच्या केमिस्ट्रीच्या एका अध्यापिकीने काही फ़ोर्मुले चुकीचे शिकवले. ते निदर्शनास आल्यानंतर आम्हाला पाटी कोरी करायला सांगून सगळा काही पुन्हा नव्याने शिकवलं. तरी परीक्षेत थोडासा गोंधळ काय तो उडालाच. असंच झालय का आत्तापण? नकळत पणे चुकीची लिहिली गेलेली सूत्रे आता एक बोळा फिरवून पुन्हा शिकवता आणि लिहिता येतील? आणि सुदैवाने असे झालेच तरी आयुष्याच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ उडणार नाही ह्याची खात्री कुठे आहे? कारण एकच साधी गोष्ट आम्हाला एकदा खूप चुकीची शिकवली आहे आणि आता तिची खरी संकल्पना समजावून घेण्याच्या मनस्थितीत आहोत का आम्ही?