भयाण वास्तवाचं
झणझणतं काजळ
जे रोज नव-नव्या नजरा
अंगावर घेते
आणि बंधनात अडकवणारे घुंगरू
जिथे न भीती
न लाज आडवी येते
प्रत्येक शहराच्या एका कोपऱ्यात अशी एक अंधारात रमणारी, आणि दुसऱ्यांच्या वासना पुरवून त्यांचं क्षणिक जग उजळवणारी वसाहत असतेच. सततची गर्दी, अंधाराची सवय झालेले आणि त्याच अंधाराची वाट बघणारे डोळे, संवेदना हरवलेल्या नजरा, शृंगाराला सततची गरज समजणारी मनं… कुठून सुरुवात होते? आणि कुठे संपत हे सगळ? आणि खरच संपत? बऱ्याच वेळा काही वृत्तपत्रांमधून आणि वाहिन्यांवरून अस समजत की, अनेक महिला आणि मुलींना या आगीत बळचं ढकललं जात. पण वास्तविक पाहता, स्वतःहून वेश्याव्यवसायात जाणाऱ्या स्त्रियांची संख्या खूप आहे. कोणत्या समाजामध्ये, संस्कृतीमध्ये अस नव्हतं? इतिहासामध्ये अपवादासाठीसुद्धा अस उदाहरण सापडणार नाही.
स्त्रियांच्या सौंदर्यात भर टाकणारे पैंजण… चिमुकलीच्या पायात छुम छुम वाजणारे पैंजण सगळं आंगण दुमदुमून टाकतात. पण मग पैंजण घुंगरू होतात तेव्हा? भारतीय शास्त्रीय नृत्यात घुंगराना अनन्यसाधारण महत्व आहे. ते निर्विवाद आहे. पण, त्या नृत्यामधल्या घुंगराना बदनामीची, वासनेची झालर मुळीच नसते. ती एक कला आहे. मान-मरतब वाढवणारी आणि दाद मिळवणारी. पण इकडे ते घुंगरू ओळख हरवतात का? जिथे संवेदनाच हरवते आणि स्वतःसाठी वाटणारी सहानुभूती पण मेलेली असते, तिथे घुंगरांच्या महत्वाच काय घेऊन बसता. या सगळ्या मागची मानसिकता आणि भूमिका समजून घेण म्हणजे शून्यात नजर लाऊन बसण्यासारख आहे. ज्याचं उत्तर कोणाकडेच नाही, पण म्हणून प्रश्नच विचारण सोडून द्यायचं का? या भीषण वास्तवाकडे किती काळ आपला सुद्न्य समाज पाठ फिरवणार?
मुळात हा गडद रंगाचा समाज तुमच्या-आमच्या सारख्या पांढऱ्या, आणि उगाचच स्वछ म्हणवणाऱ्या समाजानेच बनवला. हातात घेतलेल्या नव्या कोऱ्या पांढऱ्या रंगाच्या रुमालाला डाग पडून तो लगेच खराब होऊ नये, म्हणून रुमालाच्या एकाच कोपऱ्याला हात पुसतो न आपण? अगदी तसच. तसच केल आपण, अजूनही करत आहोत. पूर्वी राजे, धनिक समाज या वाटेकडे वळायचे. म्हणतात न, पोटासारखी वाईट गोष्ट नाही. त्यामुळे वेळोवेळी या वाटेला पैसा कमवण्याचा एक मार्ग म्हणूनच पाहिलं गेल. आणि तसं पण, पैसा हे एकच कारण आहे. पण त्या नंतर काय? महिलांचे स्वास्थ्य, बदलत जाणारी मानसिकता, वाढत जाणारे वय आणि निर्माण होणारे शारीरिक, मानसिक, व्यावहारिक प्रश्न, जन्माला येणारी अर्भक, ठराविक वयानंतर व्यवसाय बंद झाला की त्या नंतर गरजेच असणार पुनर्वसन या आणि अशा अनेक प्रश्नाचं काय? सगळ्यात जास्त संवेदनशील असणाऱ्या या विषयाकडे इतक रुक्ष पणे पाहणाऱ्या आपल्या डोळ्यांना ही अशी सवय लागली आहे की, विसर पडला आहे? साक्षात स्वामी विवेकानंद भारतात आल्यानंतर सोनागाचीला जाऊन ढसाढसा रडले होते, त्यांच्या एक दशांश संवेदना जरी आपल्याला आपल्या छोट्याश्या कामातून, विचारांमधून जागवता आली, तरी लवकरच दृष्टीकोन आणि 'ती' नजर बदलायला सुरुवात होईल.
