लहानपणी हातात हात धरून किंवा खांद्यावर बसवून बाबा फिरायला न्यायचे. जग किती साध, सरळ, सोप्प आणि मस्त वाटायचं. मला अजून आठवत. दर शनिवारी मी सकाळी लवकर उठून आवरून बसायचे. त्यावेळी आम्ही नगरला राहायला होतो. सकाळी उठायचं, आवरायचं आणि गाड़ी जवळ जाऊन उभ राहायचं. मी एकदम बाबांसारख तयार व्हायचे. बाबा गाडीची चावी खिशात टाकायचे आणि टी-शर्टच्या खिश्यात कायम दोन पेन, एक टेस्टर (इंजीनियर होते न) ठेवायचे. बास, मी पण तसच तयार व्हायचे आणि मग आमची स्वारी निघायची.
आधी हनुमानाच मंदीर आणि मग अगदी त्या समोरची एक बेकरी. मला हवं ते मी मागायचे आणि बाबांनी कधी नाही म्हटलेलं मला आठवत नाही. प्रत्येक वेळी ताई शाळेत असायची म्हणून आम्ही घरी जाताना तिला खाऊ घेऊन जायचो पण तो मात्र माझ्याच पसंतीचा. बाबांचा कायमच माझ्यावर खूप विश्वास होता. स्कॉलरशीपचा अभ्यास बाबांनी स्वतः घेतलेला आणि मला स्पष्ट संगीतलेल की बाकी काही कर पण गणितात पैकीच्या पैकी हवेत आणि पेपर देऊन बाहेर आल्यावर मी ओरडत सुटलेले की बाबा फ़क्त एक गणित चुकलं. निकाल आला ९८/१००.
माझ्या प्रत्येक निकाला आधी मला काहीतरी बक्षिस देणारे माझे बाबा. मुली म्हणून कधी राग राग तर सोडा पण साध रागवलेल पण मला आठवत नाही. माझ्या जन्माच्या आधी मुलगी होणार माहीत होत. उलट घरात तर सगळे खुश होते. बाबा तर म्हणायचे की आमच्याकडे पाचव्या पिढीला मुली झाल्या आहेत. गणित आणि इंग्रजी त्यांचे आवडते विषय. त्यांनीच हट्टाने मला शिकवले. माझ्या मागच्या वाढदिवशी आई आणि बाबांनी मिळून २१ वर्ष पूर्ण झाली म्हणून छोटे छोटे २१ गिफ्ट्स आणले. लाड हा खूपच साधा शब्द वाटतो मला.
आज बाबा नाहीत. त्यांना जाऊन ४ महीने होतील. कमी जाणवते. पण मला या परिस्थितीवर उत्तर काही सापडत नाही. ते शोधाव अस वाटत पण नाही. पण एक नक्की, I miss you… ते म्हणतात न, जगाच्या पाठीवर सगळ मिळेल पण आई बाबा काही मिळत नाहीत.